तेहरान – फ्रेंच व्यंगचित्र मासिक “चार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चार्ली हेब्दोने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर फ्रान्सच्या राजदूताला आता समन्स बजावण्यात आले आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर चार्ली हेब्दोने अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात व्यंगचित्र प्रकाशित केले होते.
या आठवड्यात, मासिकाने 2015 च्या पॅरिस कार्यालयांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त “बीट द मुलाज’ या थीमसह “7 जानेवारी’ शीर्षकाची आवृत्ती प्रकाशित केली.
7 जानेवारी 2015 रोजी फ्रेंच वंशाच्या अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करून 12 व्यंगचित्रकारांची हत्या केली होती.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून निषेध
इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांनी ट्विट करून या घटनेचा तिव्र शब्दांत निषेध केला आहे. “कार्टून प्रकाशित करताना, एका फ्रेंच प्रकाशनाने धार्मिक आणि राजकीय अधिकाऱ्याविरुद्ध अपमानास्पद आणि अशोभनीय कृत्य केले आहे, जे सहन केले जाऊ शकत नाही,’ असे म्हटले आहे.