जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे हृदयविकाराचे प्रमाणही वाढणार
वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने आपला ताजा आरोग्यविषयक अहवाल जाहीर केला असून या अहवालातील निष्कर्ष प्रमाणे 2030 पर्यंत जागतिक पातळीवर स्थूलपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. एवढेच नाही तर स्थूलपणाशी संबंधित असलेल्या हृदयविकाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
जागतिक आरोग्य संघटने नुकताच आपला ग्लोबल ॲक्शन प्लॅन ऑन फिजिकल अॅक्टिविटी हा नवीन अहवाल प्रदर्शित केला आहे, त्यामध्ये व्यायामाच्या अभावी आणि शारीरिक कसरतिच्या अभावी होणाऱ्या रोगांवर प्रकाश टाकला आहे. आगामी दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक पातळीवर सर्वत्रच लोकांच्या शारीरिक गतिविधी कमी होणार असल्याने स्थूलपणाचे प्रमाण वाढणार आहे आणि स्थूलपणाशी संबंधित हृदयविकार आणि मधुमेह यासारख्या विकाराचे प्रमाणही वाढणार आहे.
अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे, “2030 पर्यंत 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना हृदयविकाराचा धोका जाणवणार आहे. आधुनिक काळात तरुण पिढी सुद्धा व्यायामाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचे दुष्परिणाम आगामी कालावधीमध्ये जाणवणार आहे. त्यामध्येही महिलांमध्ये आणि तरुण मुलींमध्ये व्यायाम करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांच्यामध्ये स्थूलपणाची समस्या अधिक वाढणार आहे.
आरोग्याची जपणूक करण्यासाठी ज्याप्रमाणे व्यसनापासून दूर राहायला हवे त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनी व्यायाम आणि शारीरिक हालचालींकडे जास्त लक्ष दिले तर त्यांना अधिक आरोग्यपूर्ण जीवन उपलब्ध होऊ शकते असे या अहवालात म्हटले आहे. नेहमीच व्यायाम आणि शारीरिक कसरती करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार आणि मधुमेह होण्याचा धोका खूपच कमी असतो.
शारीरिक कसरती करणे याचा अर्थ अतिरेकी पद्धतीने शरीराला कष्ट देणे असा नसून नियमित चालणे किंवा धावणे किंवा सायकलिंग करणे किंवा पोहणे यासारख्या व्यायामाने सुद्धा आरोग्यपूर्ण जीवन शैली प्राप्त होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.