लोणी काळभोर -उरूळी कांचन (ता. हवेली) येथील करोनाबाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना व उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 51 पैकी 49 जणांचे करोना चाचणी अहवाल मिळाले असून त्यातील डॉक्टर, नर्स व तंत्रज्ञ या तिघांना करोनाची बाधा झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
यातील तंत्रज्ञ हा लोणी काळभोरमध्ये वास्तव्यास असल्याने करोनाने लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अहवाल आलेल्यांमध्ये लोणी काळभोरमधील तिघांना करोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेले तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर तसेच इतर अशा एकूून 51 पैकी 49 जणांच्या चाचणी अहवालात तीन जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समजल्याने आरोग्य विभागासह लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उरुळी कांचन येथील एक महिला शुक्रवारी (17 एप्रिल) लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात येताच, संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला तत्काळ पुढील उपचारासाठी पुणे येथील नायडू रुग्णालयात पाठवले होते.
त्यानंतर तिचेवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड इन्चार्ज, तंत्रज्ञ व पेशंट केअर अशा एकूण 38 जणांना रुग्णालयातील एका मजल्यावर क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर एकूण 51 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
तीन किलोमीटर परिसर सील
तंत्रज्ञ लोणी काळभोरमध्ये राहत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव व आरोग्य कर्मचारी तत्काळ त्या परिसरात गेले. पोलीस आणि महसूल प्रशासनाने सहायाने तीन किलोमीटर अंतरातील क्षेत्र प्रतिबंधित जाहीर केले.