मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिच्या बॉलीवूडमधील करिअरला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड इंडस्ट्रीवर भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत तापसी म्हणाली की, “इंडस्ट्रीत काम करताना माझ्याबरोबर अनेकदा भेदभाव करण्यात आला. पण याची कल्पना असल्याने याबाबत मी कधीच तक्रार केली नाही. इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असेल, तर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागते. प्रत्येक चित्रपटासाठी संघर्ष करावा लागतो. एका ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलत नाही. स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सतत चांगले काम करत राहावे लागते,”
पुढे ती म्हणाली, “इंडस्ट्रीतील वातावरण बहुतेक वेळा तुमच्या विरोधात असते याची कल्पना असूनही तुम्हाला बॉलीवूडचा एक हिस्सा व्हायचे असेल, तर ती तुमची स्वत:ची निवड आहे यासाठी तुम्ही कोणालाच तक्रार करू शकत नाही. बॉलीवूडमध्ये काही विशिष्ट ग्रुप असतात याबाबत आता लोकांनाही माहिती आहे. परंतु प्रत्येक कलाकाराला आपल्या आवडत्या भूमिकेची निवड करण्याचा अधिकार असला पाहिजे.”
दरम्यान, तापसीने 2013 मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने आतापर्यंतच्या पिंक, थप्पड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केले आहे. तापसी लवकरच दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार शाहरुख खानसोबत झळकणार आहे.