ऑगादोगो, (बुर्किना फासो) – बुर्किना फासोचे अध्यक्ष रॉक मार्क ख्रिस्चियन काबोरे यांच्या घराजवळ रविवारी रात्री गोळीबार झाला. राजधानीतील लष्करी तळावर सैनिकांनी केलेले बंड अजूनही सुरू असल्याची शक्यता त्यामुळे दिसू लागली. या तळावरील अनेक सैनिकांनी या तळाचा ताबा घेतला आहे. दिवसभराच्या धुमश्चक्रीनंतर रात्रीही या तळावरून गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. तरिही सैन्याने बंड पुकारले नाही आणि देशातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे, अशी हमी सरकारी अधिकाऱ्यांकडून जनतेला दिली जात होती. मात्र संध्याकाळी सशस्त्र बंडखोरांसह निदर्शकांनी काबोरे यांच्या पक्षाशी संबंधित इमारत पेटवून दिली.
गोळीबार झाला त्यावेळी काबोरे हे घरी होते की नाही, हे समजू शकलेले नाही. यावेळी या परिसरात हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते, असे स्थानिकांनी सांगितले. अध्यक्षांच्या घराच्या परिसरात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे काही सैनिकांनी वृत्तसंस्थेला सांगितले. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. राजधानीत काही ठिकाणी सैनिकांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरले होते. सरकारी दलांनी अश्रुधूराच्या नळकांडा फोडून त्यांना हुसकावून लावले. आफ्रिकेतील इकोवास गटाने बुर्किना फासोच्या अध्यक्षांना पाठिंबा देऊ केला आहे. बंडखोरांशी अध्यक्षांनी चर्चा करावी असे आवाहनही इकोवासने केले आहे.