हैदराबाद – बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानकावर 17 जून रोजी झालेल्या “पार्सल ब्लास्ट’ प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकरणात हैदराबादमधील दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतादी संघटनांशी असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.
हैदराबादमधून इमरान खान उर्फ इमरान मलिक आणि नासिर खान उर्फ नासिर मलिक या सख्ख्या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेलंगणा पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएने ही कारवाई केली. पाकिस्तानमधील “लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनांशी या दोघांचा संबंध असून पाकिस्तानमधून येणाऱ्या सूचनांच्या आधारे त्यांनी स्फोटकं रेल्वे स्टेशनवर पोहोचवण्याचे काम केल्याचा संशय आहे.
चालत्या रेल्वेत स्फोट घडवून अधिकाधिक लोकांना टार्गेट करण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी एका कपड्याच्या बॅगेत काचेच्या बाटलीतून 100 मिली लिक्विड एलईडी त्यांनी भरले होते. मात्र चालत्या रेल्वेत स्फोट न झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
अटक झालेल्यांपैकी नासिर मलिक हा आयईडीचा वापर करून स्फोट घडवण्यात माहिर असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नासिर मलिक 2012 साली पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याचे पुरावेदेखील तेलंगणा पोलिसांना सापडले आहेत. तिथेच आयईडीचा स्फोट करण्याचे प्रशिक्षण त्याने घेतले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.