वेदांतिकाराजे भोसले; रोजगार निर्मिती, शहराचा कायापालट करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश
सातारा – सातारा शहर हेच राजघराण्याचे कुटुंब आहे. दोन्ही राजे नेहमीच कुटुंबप्रमुख या भूमिकेतून सातारकरांच्या समस्या सोडवत असतात. मेडिकल कॉलेज, नवीन मेगा प्रोजेक्ट आणि रोजगार निर्मितीसह सातारा शहराचा कायापालट करण्यासाठीच दोन्ही राजे भाजपमध्ये गेले असून दोघांनाही भरघोस मतांनी निवडू द्या. दोन्ही राजे सातारकरांच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाहीत, असा शब्द सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिला. गोडोली आणि पापाभाई पत्रेवाले याठिकाणी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, शेखर मोरे पाटील, रवी ढोणे, सौ. मनिषा काळोखे, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, स्मिता घोडके, प्रकाश बडेकर, जेष्ठ नेते व्यंकटराव मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत संकपाळ, राजू मोरे, पोपट मोरे, सुनील मोरे पाटील, शशिकांत संकपाळ, पप्पू पवार, नवनाथ काकडे, बबलू मोरे, चारुदत्त सपकाळ, शशिकांत मोरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र मोरे, ऍड. सूरज मोरे, माजी नगराध्यक्ष सचिन सारस, रवी माने, अशोक शेडगे, गजेंद्र ढोणे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आजपर्यंत दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
कधी नव्हे ते दोघांचीही एकाचवेळी निवडणूक होत असून दोघेही एकाच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आता खऱ्या अर्थाने तंटामुक्ती झाली आहे. दोन्ही राजे एकत्र असून आपण सर्वांनी एकत्र राहून दोन्ही राजांना मताधिक्य द्यावे. पाच वर्षात कधीही तोंड न दाखवणारे पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे निवडणुकीत उगवतात. मग त्यांच्या मागे जायचं का विकासाच्या मागे जायचं हे तुम्ही आम्ही ठरवले पाहिजे. शहरात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. आता मेडिकल कॉलेज होणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृृष्टी, नवीन मोठमोठ्या कंपन्या साताऱ्यात आणणे, यासारखी मोठी कामे करायची असतील तर, सत्तेशिवाय पर्याय नाही. आपल्या दोन राजांच्या आणि भाजपच्या माध्यमातूनच शहराचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांना विजयी करुन आपल्या सातारा शहराचा कायापालट करुया, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
यावेळी सौ. कदम, शेखर मोरे पाटील, व्यंकटराव मोरे, भरत संकपाळ, रवी ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिल मोरे, गजेंद्र ढोणे यांनी प्रास्ताविक केले. किशोर शिंदे यांनी आभार मानले. दोन्ही कोपरा सभांना युवक, युवती, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.