रद्द झालेली सभा कसब्यातच होणार
पुणे – पावसामुळे रद्द झालेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता येत्या सोमवारी (14 ऑक्टोबर) होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातच ही सभा होणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा विधानसभेचे उमेदवार अजय शिंदे यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. 9) पुण्यात फोडण्यात येणार होता. त्यासाठी राज ठाकरे यांची सभा सायंकाळी 6 वाजता होणार होती. मात्र, त्याचवेळी शहरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ही सभा केव्हा होणार याबाबत राजकीय चर्चा सुरू होत्या.
मात्र, मनसेकडून आता सभा सोमवारी होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पुण्यात “राजगर्जना’ पुन्हा होणार असल्याचे निश्चित झाले असून ही सभा कसबा विधानसभा मतदारसंघातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.