बोफोर्स घोटाळ्यावरून राहुल यांच्यावर बाजी पलटवण्याचा मोदींचा प्रयत्न 

पणजी – राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, मोदींनी बोफोर्स घोटाळ्यावरून राहुल यांच्यावर बाजी पलटवण्याची रणनीती अवलंबली आहे.
मोदींनी बुधवारी येथे झालेल्या सभेत बोफोर्स घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. वडिलांनी (दिवंगत राजीव गांधी) केलेल्या बोफोर्स पापाचा ताण राहुल यांच्यावर आहे. त्यातून ते इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असे मोदी म्हणाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर अलिकडेच प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्या कारवाईतून कोट्यवधींची बेहिशेबी रोकड गोळा करणारे रॅकेट उघड झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचा संदर्भ देऊन मोदींनी कॉंग्रेस आणि नाथ यांच्यावर निशाणा साधला.

मध्य प्रदेशात 15 वर्षांनंतर कॉंग्रेसला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. तेथील सरकारच्या स्थापनेला अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र, छोट्या कालावधीत त्यांनी मोठी लूट केली आहे. ते प्रकरण म्हणजे तुघलक रोड निवडणूक घोटाळा आहे. कॉंग्रेसच्या नावावर आणखी एक घोटाळा नोंदवला गेला आहे. तसे असताना त्या पक्षाला देश लुटण्याची अजूनही संधी आपण देणार का, असा सवाल मोदींनी जनतेला उद्देशून केला. खासदार म्हणून नाथ यांचे निवासस्थान दिल्लीतील 1, तुघलक रोड येथे आहे. तर राहुल यांचे निवासस्थान 12, तुघलक लेन या नावाने आहे. त्याकडे अंगुलिनिर्देश करत मोदींनी तुघलक रोड निवडणूक घोटाळ्याचा उल्लेख केला. मोदींनी कॉंग्रेसवर भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा अवमान केल्याचाही आरोप केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.