जन्मशताब्दी समारंभ; “प्रभात’चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांचा सत्कार
कराड – रेठरे बुद्रुक येथे गुरुवारी झालेल्या यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्य गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी विधीमंडळांसह विविध ठिकाणी केलेल्या व गाजलेल्या भाषणांचा संग्रह असलेल्या “घणाघात’ या पुस्तकाच्या संकलित लेखनाबद्दल दै. “प्रभात’चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांचा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, देवीसिंग पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.
कार्य गौरव समितीच्या वतीने “घणाघात’ या पुस्तकासह “आमचे भाऊ’ या पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. इंद्रजित मोहिते व समितीचे स्वागताध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, कल्लाप्पाणा आवाडे, दिलीप वळसे पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, सुभाषराव शिंदे यावेळी उपस्थित होते.