वाहतूक विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर आखणी
पुणे – वाहतूक कोंडी, रस्ते, सिग्नल, सीसीटीव्ही, झेब्रा क्रॉसिंग अशा एक ना अनेक विषयांवर पुणेकर सर्रास चर्चा करतात. या चर्चेमध्ये आता “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ची भर पडणार आहे. वाहतूक विभागाकडून त्रिमितीय झेब्रा क्रॉसिंगची प्रायोगिक तत्त्वावर आखणी केली आहे. लवकरच संपूर्ण शहरातदेखील “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ आखणी होणार आहे.
प्रामुख्याने युरोपियन देशांमध्ये “थ्री-डी’ तंत्रज्ञानाचा वापर करुन झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहेत. याच धर्तीवर दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथील प्रमुख रस्त्यांवर आखणी केली होती. यामुळे जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे जाते. दिल्लीनंतर पुणे शहर वाहतूक विभाग “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ची आखणी शहरात करण्याबाबत विचाराधीन आहे.
प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक शाखेच्या येरवडा येथील कार्यालयाच्या आवारामध्ये याची आखणी केली आहे. याबाबत वाहतूक विभागाने महापालिकेला “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ रंगवण्याचा प्रस्ताव दिला आहे. वाहतूक शाखा आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
याअंतर्गत रस्त्यांवर त्रिमितीय (थ्रीडी) पट्टे आखण्यात येणार आहेत. “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ हा “ऑप्टिकल’ भ्रम आहे. यामुळे वाहनचालकांना रस्त्यावर बॉक्स असल्यासारखे वाटणार आहे. परिणामी वाहनचालकांकडून जंक्शनजवळ वेग कमी होणार आहे.
वाहनांचा वेग कमी झाल्याने अपघातांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. पादचाऱ्यांना देखील सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे.
सुरूवातीला “थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू आहे. वाहनांचा वेग कमी होण्यासाठी याची मदत होणार आहे. हा प्रयोग करण्यासाठी शहरांतील रस्त्यांची पाहणी करण्यात येत आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.