आपल्या पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली लपलेल्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक सतत संशोधन करत आहेत, ज्यामध्ये अनेक धक्कादायक परिणाम देखील समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी पुरातत्वशास्त्रज्ञांना इस्रायलमधील एका थडग्याच्या उत्खननादरम्यान आश्चर्यकारक अवशेष सापडले आहेत. या उत्खननात त्यांना हजारो वर्षांपूर्वी मेंदूच्या शस्त्रक्रियेचे पुरावे मिळाले, ते पाहून स्वत:ला आधुनिक युगातील मानणारे वैद्यकीय शास्त्रही अचंबित झाले. त्याचवेळी उत्खननात पुन्हा एकदा धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. खरं तर, सौदी अरेबियामध्ये 7 हजार वर्षे जुने एक रहस्यमय स्मारक सापडले आहे, ज्याच्या खाली मानवी अवशेष सापडले आहेत. फक्त माणसांचीच नाही तर शेकडो प्राण्यांची हाडे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे स्मारक वाळवंटात सापडले आहे. हा भाग पूर्णपणे वाळूने व्यापलेला आहे, जिथे मानवी उपस्थितीचे पुरावे यापूर्वी कधीही सापडले नव्हते.
पुरातत्वशास्त्रज्ञांचे असे मत आहे की हजारो वर्षांपूर्वी हा परिसर अतिशय हिरवागार होता आणि येथे मानवाची वसाहत होती. पुराव्यांनुसार येथील लोक हत्ती आणि पाणघोडे पाळत असत. हे अवशेष पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
एका अहवालानुसार, या ठिकाणाहून एका पुरुषाचे अवशेष सापडले आहेत, ज्याचे वय सुमारे 30 असावे. हे ठिकाण कुठल्यातरी पंथाच्या धार्मिक विधींचे ठिकाण असावे असा कयास आहे. सौदी अरेबियामध्ये 1970 पासून अशा मस्टॅटिल्स (mastatils) शोधल्या जात आहेत. मस्टॅटिल हे वाळूच्या दगडाच्या भिंतींनी बनवलेले प्रागैतिहासिक स्मारक आहे, जे सौदी अरेबियाच्या वायव्य भागात आढळते. आतापर्यंत सुमारे 1600 अवशेष सापडले आहेत. यापैकी बहुतेक वाळूच्या खाली खोलवर आढळून आले आहेत.
एका अभ्यासानुसार, संशोधकांचा असा अंदाज आहे की एके काळी हा हिरवागार परिसर हवामानातील तीव्र बदलांमुळे वाळवंट बनला आहे. त्या वेळी लोकांना वाटले असेल की आपण देवाला प्रसन्न करून स्वतःचा उद्धार करू शकतो. अशा स्थितीत त्यांनी प्राण्यांचा बळी दिला असावा.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका मेलिसा केनेडी म्हणाल्या की हे लोक कोणत्या पंथाचे आहेत आणि ते कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतात हे त्यांना अजून कळू शकले नाही. या वास्तूंकडे पाहून ही रचना कोणत्या ना कोणत्या प्रथेशी संबंधित आहे असा अंदाज बांधता येतो.