Bogus Firms: बनावट नोंदणीविरोधातील मोहिमेमुळे करोडो रुपयांचा महसूल वाचवण्यास मदत झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. GST अधिकार्यांनी सांगितले की, बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावे करणाऱ्या 29,273 बनावट कंपन्या शोधून काढल्या आहेत. यामुळे 4,646 कोटी रुपयांचा महसुल वाचवण्यात मदत झाली आहे. ही डिसेंबर 2023 पर्यंतची आकडेवारी आहे, यामध्ये आठ महिन्यांत 44,015 कोटी रुपयांचे खोटे दावे करण्यात आले. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमधील जास्त प्रकरणे आहेत.
कोणत्या राज्यात किती बनावट कंपन्या?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 4,153 बनावट कंपन्या आढळून आल्या. यामध्ये सुमारे 12,036 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट चोरीचा समावेश आहे. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी यापैकी 2,358 बनावट कंपन्यांचा शोध लावला आहे. महाराष्ट्रात 923 बनावट कंपन्या असून ते आघाडीवर आहे. यानंतर राजस्थान (507), दिल्ली (483) आणि हरियाणा (424) यांचा क्रमांक लागतो.
तीन महिन्यांत 41 अटक, जीएसटी अधिकारीही सक्रिय –
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, डिसेंबर तिमाहीत 1,317 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. 319 कोटी रुपये वसूल झाले. ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून 997 कोटी रुपये सुरक्षित केले गेले. या प्रकरणांमध्ये 41 जणांना अटकही करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी 31 जणांना अटक केली आहे.
सरकारी तिजोरीत एकूण 4,646 कोटी रुपयांची बचत –
मे 2023 च्या मध्यात बनावट नोंदणीविरोधात एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून, 44,015 कोटी रुपयांच्या संशयित इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चोरीमध्ये गुंतलेल्या एकूण 29,273 बनावट कंपन्या सापडल्या आहेत, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. या कंपन्यांवरील कारवाईमुळे सरकारी तिजोरीत एकूण 4,646 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
दिल्लीत सर्वाधिक चोरी, महाराष्ट्रात सर्वाधिक बनावट कंपन्या –
आयटीसी ब्लॉक करून 3,802 कोटी रुपयांची बचत झाली, तर रिकव्हरीद्वारे 844 कोटी रुपयांची बचत झाली. या सर्व प्रकरणांसह आतापर्यंत 121जणांना अटक करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरच्या तिमाहीत, महाराष्ट्रातील 926 शेल कंपन्यांनी 2,201 कोटी रुपयांचा संशयित कर चुकवला आहे. या कारवाईदरम्यान 11 जणांना अटक करण्यात आली. दिल्लीतील 483 बनावट कंपन्यांनी 3028 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा संशय आहे. येथेही 11 जणांना अटक करण्यात आली.
कोणत्या राज्यात किती आरोपींना अटक –
आंध्र प्रदेशमध्ये 19 बनावट कंपन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये 765 कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याची माहिती मिळाली. हरियाणामध्ये 424 बनावट कंपन्यांनी 624 कोटी रुपयांचा कर चुकवला. उत्तर प्रदेशमध्ये 1,645 कोटी रुपयांची जीएसटी चोरी झाल्याचा संशय आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत एकूण 443 बनावट कंपन्यांचा पर्दाफाश करण्यात आला. यूपीमध्ये करचुकवेगिरीच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे.