Bobby Deol : ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादु दाखवण्यात यशस्वी ठरत आहे. जगभरात आतापर्यंत या चित्रपटाने 600 कोटींहुन अधिक रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉबी देओलने (Bobby Deol) साकारलेल्या अबरार भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अॅनिमल चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता बॉबी देओल तामिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. साऊथ स्टार सुर्याच्या ‘कांगुवा’ (Kanguva) या चित्रपटात बॉबी काम करणार आहे.
तमिळ दिग्दर्शक शिवा यांच्या ‘कंगूवा’मध्ये बॉबी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी बॉबीने तयारी करायलाही सुरुवात केली आहे. एका मुलाखतीमध्ये बॉबीने या चित्रपटाबद्दल सांगितले की, “होय, मी सुर्यासोबत कांगुवा या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाची टीम अप्रतिम आहे, शिवा हा स्विटहार्ट आहे आणि सुर्या हा एक अप्रतिम अभिनेता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खरा आनंद होतो. ही भूमिका नक्कीच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे, मला ही भाषाही येत नाही, त्यामुळे ती पुन्हा माझ्या झोनच्या बाहेरचे काम करत आहे. मी एक-दोन महिन्यात तमिळ शिकू शकत नाही, पण मी त्यावर नक्कीच काम करेन.”
दरम्यान, ‘कंगुवा’ हा चित्रपट तब्बल 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूर्याबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील दिसणार आहे. हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. सिरुथाई शिवा दिग्दर्शित कांगुवा या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. ‘अॅनिमल’ नंतर आता बॉबी देओलचा आगामी चित्रपट पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.