पराग शेणोलकर
कराड -महापूराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा-कोयना नदीपात्रात येथील प्रीतिसंगमावर महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून पूर परिस्थिती हाताळणे, शोध आणि बचावाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाच्या नावाखाली बोट सवारीचे आयोजन केल्याची चर्चा शहरात आहे. कोणत्याही प्रात्यक्षिकाशिवाय पार पडलेल्या बोट प्रशिक्षणात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह काही नगरसेवकांनी बोटींगचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा आपत्ती प्राधिकारण सातारामार्फत कराड तालुक्यातील पूर परिस्थिती हाताळणे आणि शोध व बचाव कार्यासाठी साडेपाच लाख रूपये किंमतीची एक बोट अशा दोन रबरी बोटी, दहा लाईफ जॅकेट व दहा लाईफ रिंग तसेच अन्य साहित्य देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर बोट प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व त्याबाबतची तांत्रिक माहिती देण्यासाठी सोमवार दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणासाठी कराडसह मलकापूर, सुपने, उंब्रज, सैदापूर, टेंभूसह नदीकाठच्या गावातील महसूली कर्मचारी, सरपंच तसेच स्वयंसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते.
प्रशासनाकडून लेखी आदेशासह सोशल माध्यमांव्दारे दोन वाजता उपस्थित राहण्याचा संदेश दिला होता. मात्र, 3.30 वाजेपर्यंत एकही अधिकारी अथवा बोट व साहित्य प्रीतिसंगमावर दाखल झाले नव्हते. दरम्यानच्या काळात बहुतांश प्रशिक्षणार्थी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून निघून गेले. त्यानंतर बोटींचे साहित्य घेऊन एक टेंपो प्रीतिसंगमावर आला. त्यावेळी उपस्थित तलाठी, सर्कल तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या समवेत ते साहित्य नदीपात्रात घेऊन जाण्यासाठी मदत केली.
बोटींचे सुट्टे पार्ट जोडण्यात आले. बोटी पाण्यात ढकलल्यानंतर उत्साही लोकांनी बोटीत गर्दी केली. क्षमतेपेक्षा अधिकजण बसूनही बोट पाण्यात मार्गस्थ करण्यात आली. बोट सुमारे 200 मीटर पाण्यात जाऊनही बोटीचे इंजिन सुरू होत नसल्याने उपस्थित तांत्रिक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथून आलेल्या युवकांनी प्रशिक्षण देण्याएवजी बोट जोडताच नदी पात्रातून सवारीचा आनंद घेतला. दुसरी बोट जोडून तयार झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी आलेल्या काहींनी गर्दी केली.
याही बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याचे बोट तज्ज्ञांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी काहीजण बोटीतून खाली उरतले. मात्र, लाईफ जॅकेट नसतानाहीही बोट मार्गस्थ झाली. पहिली बोट सवारी करून आल्यानंतर त्या बोटीत मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर, ओंमकार आपटे व माध्यमांचे प्रतिनिधी यांची बसून नदी पात्रातील मारूती मंदिरपर्यंत व पुन्हा प्रीतिसंगमापर्यंत सवारी केली.
दरम्यान, प्रात्यक्षिकाचा महत्वपूर्ण भाग म्हणून आणलेल्या लाईफ रिंग जशाच्या तशा पॅकबंद होत्या. प्रशासनाने पूर आपत्ती निवारणासाठी केलेल्या खटाटोपात प्रकर्षाने प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दिसून आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा उद्देश असफल झाल्याची चर्चा आहे.
गाडी ढकलण्याचे प्रशिक्षण…
प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वांची वाहने प्रीतिसंगम बागेसमोर पार्क केली होती. मात्र, प्रशिक्षणासाठी उशिरा दाखल झालेल्या कराडच्या मुख्याधिकारी यांनी आपले वाहन थेट नदीपात्रात आणले. प्रशिक्षणानंतर गाडी चालकाने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी चिखलात रूतली. यावेळी प्रशिक्षणासाठी आलेले प्रशिक्षणार्थी लोक व सरकारी कर्मचाऱ्यांना चक्क गाडी ढकलण्याचेच प्रशिक्षण मिळाले.
विनाजॅकेट प्रशिक्षण…
आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणानिमित्त कराडचे तलाठी जंगम यांनी पुरात पट्टीच्या पोहणाऱ्या काही तरूणांना निमंत्रित केले होते. त्यांपैकी अनेकांनी प्रशिक्षणा दरम्यान विना लाईफ जॅकेट प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.