पुणे – ढोल ताशाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड्च्या अंध विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक दिमाखात निघाली. पाच दिवसाच्या गणेशोत्सवात अंध विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून गणरायाला साश्रू नयनांनी निरोप दिला.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गाडी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, फुलांच्या माळांची आकर्षक पद्धतीने सजावट केली आणि मग मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौकाच्या दिशेने निघाली. प्रत्येकजण पावसात भिजत नाचण्याचा मनमुराद आनंद घेत होता. सलमान शेख हा नेत्रहीन विद्यार्थी भान हरपून ढोल वाजवत होता, आदीनाथ, मनोहर, श्रद्धा, अंकिता या आमच्या नेत्रहीन विद्यार्थी, विद्यार्थिनी ताशा वाजवत होत्या. सुलोचना, संजना, कृष्णा, रुद्राक्ष इ. नेत्रहीन विद्यार्थी, विद्यार्थिनी अगदी बेभान होऊन ढोल, ताशाच्या तालावर नाचत होते.
या मिरवणुकीमध्ये नेत्रहीन विद्यार्थिनीदेखिल कुठेही मागे नव्हत्या, त्यांच्यातला उत्साह, ऊर्जा वाखणण्याजोगी होती. ढोल, ताशा, झांजा वाजवत या नेत्रहीन मुली, मुलांच्या बरोबरीने या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. काही जणी ढोल, ताशाच्या तालावर फेर धरून बेभान होऊन नाचत होत्या, तर काहीजणी फुगड्या घालत होत्या. नेत्रहीन, कर्णबधीर, मुकबधीर, अशा वेगवेगळ्या शारीरिक अपंगत्वाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख व विश्वस्त देवता अंदुरे- देशमुख यांनी या संपूर्ण मिरवणुकीचे संचालन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.