नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. त्यातच करोनासोबत आता ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगस आजार करोनामुक्त झालेल्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेच वातावरण आहे. या आजारासंदर्भात ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनाच म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस, कँडिडा आणि एस्पोरेजनसची लागण होते. तसेच ब्लॅक फंगस हा आजार संसर्गजन्य नाही. प्रतिकारशक्ती कमी हेच ब्लॅक फंगस होण्यासाठीच एकमेव कारण असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केलं.
दरम्यान ब्लॅक फंगस आजार सायनस, राईनो ऑर्बिटल आणि मेदूवर आघात करतो. आता छोट्या आतड्यातही ब्लॅक फंगस दिसून आला आहे. मात्र वेगवेगळ्या रंगांनी या आजाराला ओळखणे चुकीचं असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
ब्लॅक फंगस आजार एकमेकांना स्पर्श केल्याने पसरत नाही. मात्र स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करायला हवं. गरम पाणी प्या. नाकात त्रास, गळा खवखवणे, चेहऱ्यावरील संवेदना कमी होणे, पोटदुखी, ब्लॅक फंगसची लक्षण आहेत. ब्लॅक फंगसच्या रंगापेक्षा लक्षणांवर लक्ष द्यावे, जेणेकरून उपचार लवकर झाला तर बचाव होतो, अशा सूचनाही डॉ. गुलेरिया यांनी केल्या.