जळोची ( Baramati Lok Sabha Election 2024) – शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून फारकत घेत महायुतीत दाखल झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणूकीत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.
महायुतीत भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची मोठी साथ अजित पवार यांना लोकसभा निवडणूकीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असतील. बारामतीच्या या निवडणूकीत शरद पवार व अजित पवार यांचाच राजकीय कस लागणार आहे.
गेली तीन टर्म खासदार सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांच्यापुढे घऱातूचन भावजय सुनेत्रा पवार यांच्या रुपाने बलाढ्य आव्हान उभे राहिले आहे. बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एकहाती अंमल आहे. गत निवडणूकीत बारामतीच्या जोरावरच सुळे विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांना येथे मोठी मेहनत घ्यावी लागेल.
इंदापूरमध्ये अजित पवार यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मदत घ्यावी लागेल. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचेच आहेत. शिवाय ते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे हे दोन बडे नेते एकत्र असतील तर इंदापूरात सुनेत्रा पवार यांना फारशी अडचण येणार नाही.
दौंडमध्ये तीच परिस्थिती आहे. तेथील आमदार राहूल कुल हे भाजपचे आहेत. शिवाय त्यांच्या पत्नी कांचन कुल यांचाच गत निवडणूकीत सुळे यांनी पराभव केला होता, ती सल त्यांच्या मनात असेल. तेथील राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते रमेश थोरात व अन्य मंडळी अजित पवार यांच्या जवळची आहेत. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीचे पारडे जड राहिल. शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीची फारशी ताकद तेथे नाही.
बारामतीची लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होत असली तरी शरद पवार व अजित पवार यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे दोघेही आता कोणते डाव टाकतात, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांचे कार्य –
सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे. धाराशीवचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. विवाहानंतर त्या पवार घराण्याच्या सून म्हणून आल्या. बारामतीत एन्व्हाॅर्यमेंटल फोरम आॅफव इंडियाच्या माध्यमातून त्या गेली दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी काटेवाडी गावचा कायापालट केला.
राष्ट्रपती पुरस्कार गावाला मिळवून दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर त्या कार्यरत आहेत. फोरमच्या माध्यमातून त्यांनी बारामती व दौंड तालुक्यात जलसंधारणाची भरीव कामे केली आहेत. याशिवाय दरवर्षी नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांचे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर त्या आयोजित करतात. या शिबिराचा आजवर हजारो रुग्णांना लाभ झाला आहे.
त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र स्टेट अॅग्री अॅंड रुरल टुरुझम फेडरेशन आदींवर विश्वस्त म्हणून काम पाहतात. त्यांना आजवर मानाच्या विविध सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.