Sulabha Gaikwad| कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर अंबरनाथ मलंगड परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. याप्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर यावर सुलभा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाल्या सुलभा गायकवाड?
”मी तिथे प्रचाराला गेले नव्हते. गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती. त्या निमित्ताने तिथे गेले होते असा काही प्रकार होईल, असं मला माहित नव्हतं. मी भाजपसोबत असून मोदींना पंतप्रधान करायचा आहे. भाजपची जी भूमिका आहे, त्यासोबत मी आहे. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात मंदिराचा जिर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. त्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता किंवा प्रचार नव्हता. महायुतीचा प्रचार करणार”, असं स्पष्टीकरण भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलंय.
दरम्यान, गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजप आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदेंचे नेते महेश गायकवाड आणि भाजपच्या गणपत गायकवाडांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्याकडून पोलीस चौकीत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.