मुंबई,- मुंबई बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आज अखेर गुन्हा दाखल केला आहे. दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेही आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धनंजय यांनी तक्रार दाखल केली होती. गेले अनेक दिवस त्यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
या प्रकरणात त्यांची रितसर चौकशीही करण्यात आली त्यात ते दोषी आढळले आहेत. त्यांच्या विरोधात 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), 120-ब (गुन्हेगारी कट) यासह विविध आयपीसी कलमांखाली सोमवारी गुन्हा नोंदवण्यात आला.
दरेकर यांनी स्वतः मजूर असल्याचे भासवून त्या गटातून ते बॅंकेवर निवडून आले होते. चौकशीत त्यांचा हा दावा खोटा निघाला. ते 2011 ते 2021 या काळात मुंबई बॅंकेचे अध्यक्ष होते. त्या काळात बॅंकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
मुंबई बॅंकेचा हा आर्थिक घोटाळा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा असून या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बॅंक आणि सहकार खात्याची फसवणूक केल्याचाही दरेकरांवर आरोप ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.