पुणे – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या हस्ते गणपतीची आरती सुरु असताना मंडळाच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. पुण्यातील आंबिलओढा काॅलनी परिसरातील साने गुरूजी तरूण मंडळाच्या (Sane Guruji Tarun Mitra Mandal) गणपती देखाव्याच्या कळसाला आग लागल्याची दुर्घटना घडली असून आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग –
जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर ते पुणे येथील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आले होते. साने गुरूजी तरूण मंडळ हे पुणे शहरातील भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे मंडळ आहे. यावर्षी या मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखाला उभारला आहे. नड्डा यांच्या हस्ते आज येथील गणपतीच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक देखाव्याच्या कळसाच्या बाजूला आग लागली.
आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, गोंधळ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावे लागले. मंगळवारी सायंकाळी ही आगीची घटना घडली. काही वेळात पाऊस सुरू झाला आणि आग काही मिनिटांत विझली. मात्र, ती नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक वाॅटर टँकर ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेत देखाव्याचे नुकसान झाले पण कुणीही जखमी झालेले नाही.
#WATCH | Pune, Maharashtra: Sane Guruji Tarun Mitra Mandal catches fire.
Details awaited. pic.twitter.com/N27zSpLi7Q
— ANI (@ANI) September 26, 2023
जे.पी. नड्डा यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन –
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात जे.पी.नड्डा यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लालबागच्या राजाचे घेतले दर्शन –
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज सकाळी दहा वाजता त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तेव्हा भाजपचे नेते त्यांच्यासोबत होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह इतर भाजपचे नेते पदाधिकारी तिथे होते. गिरगावच्या केशवजी चाळ परिसरामध्ये जे पी नड्डा जी यांचे जल्लोषात स्वागत केले. लेझिम खेळत त्यांचं स्वागत केलं गेलं. यावेळी अनेक मुंबईकर नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, जे पी नड्डा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.