अमरावती – कर्नाटक दूध फेडरेशन कडून आंध्रप्रदेशातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी जो दूध पुरवठा होत असे त्याचे 130 कोटी रूपयांचे बिल आंध्रप्रदेश सरकारने थकवले असल्याने कर्नाटकने आंधप्रदेशला दूध पुरवठा करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे त्या राज्यातील 20 लाख बालकांना पोषण आहार योजनेतून मिळणारे दूध आता बंद झाले आहे. कर्नाटक दूध फेडरेशनचे नंदिनी ब्रॅंडचे सुमारे 110 लाख लिटर दूध आंध्रला दर महिन्याला पुरवले जात असे. पण गेल्या चार महिन्यापासून या दूधाचे पेमेंटच केले गेलेले नाही.
ही थकबाकीची रक्क्म 130 कोटी रूपये इतकी झाली आहे. या दूध पुरवठ्यासाठी आंध्र सरकार बरोबर जून 2020 मध्ये करार झाला होता. हे दूध गरीब मुलांना दिले जात असल्याने ते स्वस्त दराने दिले जात होते. नेहमीच्या दरापेक्षा लिटर मागे पाच रूपयांची सवलत दूध फेडरेशन कडून दिली जात होती. पण आता मात्र थकबाकी खेरीज पाच रूपये वाढीव दर दिला तरच दूध पुरवठा पुर्ववत केला जाईल असे दूध फेडरशनने आंध्रप्रदेशला कळवले आहे.