Chagan Bhujbal : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र आता ओबीसी (OBC) समाजात एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरसरकट प्रमाणपत्राला विरोध केला आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला दहशत माजवावीच लागेल, असे देखील भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, “आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे.”
“मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचा आरक्षणाला विरोध नाही. आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका, ३७५ पेक्षा जास्त जाती आमच्या आहेत. ५४ टक्क्यांपेक्षा जास्त आमचे गोरगरीब लोक आहेत. मी आज संध्याकाळी या गोष्टी मांडणार आहे. तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात बोलले पाहिजे, नाही तर मुलांचं भविष्य धोक्यात येणार आहे,” असंही छगन भुजबळ म्हणाले.
याशिवाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं एका कार्यकर्त्यासोबत संभाषण झालं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात भुजबळ कार्यकर्त्यांना ‘करो या मरो’चा सल्ला देताना दिसले.