नवी दिल्ली – एकीकडे देशात पेट्रोल आणि डीझेलच्या भावाने शिखऱ गाठलेले असल्यामुळे सातत्याने यासंबंधातील बातम्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. त्यातच भोपाळ येथील एका क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूला पुरस्कार म्हणून चक्क पाच लिटर पेट्रोल भेट देण्यात आले. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
भोपाळमध्ये झालेल्या प्रमोद शुक्ला प्रीमिअर लीग स्पर्धेतील एका क्रिकेट सामन्यात सामन्याचा मानकरी ठरलेल्या एका खेळाडूला पाच लिटर पेट्रोलचा कॅन भेट देण्यात आला व उपस्थितांमध्येही हशा पिकला. सध्या देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असून या स्पर्धेच्या आयोजकांनीच ही शक्कल लढवली आहे. हा फोटो पोस्ट करताना भोगले यांनी सध्या अशाच पुरस्कारांची जास्त गरज असल्याचा चिमटाही काढला आहे.
क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सर्वसाधारणपणे ट्रॉफी, गाडी किंवा पैसे पुरस्कार म्हणून दिले जातात. आता पेट्रोल देखील पुरस्कार म्हणून दिले गेल्यामुळे हा नवा ट्रेण्ड निर्माण होऊ शकतो. सध्या पेट्रोलचा एक लिटरचा दर देशात 98 ते 100 रुपये असल्याने या अशा पुरस्कारांसाठी आयोजकांना प्रेरणाही मिळण्याची शक्यता चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.