संगमनेर दि 8 (अमोल मतकर) – तालुक्यातील वेल्हाळे शिवारात निमगाव भोजपुर नदीवर असलेला सिमेंटचा बंधारा जिलेटीनच्या कांड्याचा वापर करून फोडण्यात आल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. एका ठेकेदाराने आणि शासकीय अधिकाऱ्यानेच तो बंधारा फोडण्यास सांगितल्याचा धक्कादायक आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संगमनेरमधील यंत्रणेला झालंय तरी काय? असा सवाल गावकरी करत आहेत.
संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजपुर शिवारात तसेच वेल्हाळे परिसरात नदीवर असलेला सिमेंटचा बंधारा काही समाजकंटकांनी सुरुंग लावून फोडला. त्यामुळे गावातील वातावरण तापले असून एका ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांनी संगनमताने एका धनदांडग्याला सांगून बंधारा फोडण्यात आल्याचा आरोप गावकरी करत आहेत. तसेच अद्यापही प्रशासनाला जाग आली नसून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पंचनामा अथवा कारवाई करण्यात आली नसल्याने गावातील शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.
बंधारे फोडणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरणार असून त्याबाबत प्रशासनाला निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया भोजापुरच्या शेतकऱ्यांनी दिली.
सदर बंधारा पुराच्या पाण्यामुळे फुटला असून तो कुणाच्या हद्दीत येतो आणि कोणत्या योजनेत आहे हे मला सांगता येणार नाही. तसेच तो बंधारा अनेक वर्षांपूर्वीचा आहे.
– सुरेश फटांगरे, सरपंच , निमगाव भोजपुर
सदर बंधारा काही समाजकंटकांनी फोडला असून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
– ग्रामस्थ, निमगाव भोजापूर