मुंबई – दिग्दर्शक आणि गायक अवधूत गुप्ते हे नाव सर्वांना परिचयाचं आहे. गाण्यासोबत अवधूत दिग्दर्शन आणि मराठी सिनेमांची निर्मिती देखील करतो. यासोबतच अनेक राजकीय पक्षांसाठी अवधूतने प्रचार गीतं देखील बनवली आहेत. नुकतंच अवधूत चर्चेत आला आहे ते त्याने बनवलेल्या भीम गीतामुळे. याबाबत स्वतः अवधूतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
येत्या १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठीच बनवण्यात आलेल्या भीमगीताची झलक अवधूत गुप्तेने आपल्या सोशल मीडियावरून सर्व प्रेक्षकांना दाखवली आहे. विशेष म्हणजे अवधूत गुप्तेने स्वतः हे गाणं लिहिलं असून संगीतबद्ध केलं आहे.
आपल्या सोशल मीडियावरून हे गाणं शेअर करत अवधूत गुप्ते म्हणतात,”माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की, विश्वरत्न भारतरत्न माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर आणि मनुष्य प्राण्याचे जीवन उद्देश समूळ बदलून टाकण्याची ताकद असलेल्या गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित एखादे भीमगीत करावे. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर संतोष जोंधळेचा आवाज ऐकला, त्याचे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवरचे प्रेम बघितले आणि मग राहावलच नाही.. म्हणून सादर करीत आहोत संतोषच्या आवाजात मी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले माझे पहिले वहिले भीमगीत”
View this post on Instagram
अवधूत गुप्तेने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतीय. अवधूतच्या या गाण्याचे सोशल मीडियावर देखील जोरदार स्वागत झाल्याचे पाहायला मिळते. अनेकांनी अवधूत गुप्तेच्या या कलाकृतीचे कौतुक केले आहे. मराठीतील अनेक स्टार्सने यावर कमेंट करत अवधूत गुप्तेला शुभेच्छा दिल्या आहेत.