पुणे – राज्यातील संगणक व मॅन्युअल टायपिंगच्या काही संस्था विद्यार्थ्यांची दिशाभूल करत अनधिकृत प्रवेश देत आहेत. अशा संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. प्रसंगी संस्थेची मान्यताही रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
संगणकीय टायपिंगच्या एप्रिल 2024 च्या परीक्षेच्या सर्व मान्यताप्राप्त संस्थामधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त टायपिंगच्या संस्थांची यादी तपासूनच प्रवेश घेणे आवश्यक आहे. परीक्षा परिषदेने दिलेल्या ई-प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर आहे का, याची खातरजमा करुनच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, यंदापासून प्रत्येक जिल्ह्यातील टायपिंगच्या प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांची नावे जाहीर करुन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. याची घोषणा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी केली. तर, कोर्सला प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाइन भरुन घेतला जाणार आहे. यामुळे नंतर ऐनवेळी परीक्षा अर्ज भरुन घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आपोआपच आळा बसणार आहे.
संस्थांचा डाव
“आमची संस्था मान्यताप्राप्त असून आमच्याकडे प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा. आमच्याकडे शासनाची परवानगी आहे. थोडे अधिकचे पैसे भरा. परीक्षेत पास करुन देऊ,’ अशी हमी काही संस्थाचालक देत आहेत. यातून विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे.
” अनधिकृत टायपिंग संस्था व प्रवेश प्रक्रिया यावर परीक्षा परिषदेची करडी नजर आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य काम करू नये. नियमबाह्य संस्थांचे विद्यार्थी परीक्षेसाठी येऊ नयेत. तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.” – डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद