Bhajanlal Sharma : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा हे आज विराजमान झाले आहेत. भजनलाल शर्मा यांचा आज वाढदिवस देखील आहे त्याच दिवशी शपथ घेतल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल कलराज मिश्रा यांनी भजनलाल शर्मा, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह देशातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
शपथ घेण्यापूर्वी भजनलाल शर्मा यांनी आई-वडिलांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय गोविंद देवजी मंदिरात जाऊन त्यांनी टोंक रोडवरील पिंजरापोळ गोशाळेत गायींना चारा खाऊ घातला. त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध गोविंद देवजी मंदिरात प्रार्थना करून केली. राज्यातील 200 जागांपैकी 199 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकून राज्याची सत्ता आपल्या हाती घेतली आहे.
शपथ सोहळ्यासाठी तीन व्यासपीठ बांधण्यात आले होते. राज्यपाल कलराज मिश्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भजनलाल शर्मा, आमदार प्रेमचंद बैरवा आणि दिया कुमारी मुख्य मंचावर बसले. एका मंचावर विविध मंत्री आणि मुख्यमंत्री बसले होते, तर दुसऱ्या मंचावर साधू समाजातील लोक बसले होते. शपथविधीदरम्यान समर्थकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या.