शिस्त लावण्यासाठी कमांडो तैनात ः लोणी काळभोरमध्ये तुकडी दाखल
लोणी काळभोर-येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनो सावधान व्हा, घरात बसा. विनाकारण फिरणार असाल तर पाठ व पार्श्वभाग चांगलाच लाल होणार आहे… कारण लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांच्यावर आळा बसावा यासाठी, जिल्हा पोलीस दलातील एक स्पेशल कमांडोची तुकडी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
विनाकारण रस्त्यावर कोणीही दिसले तरी, कमांडो पथकाने रस्त्यावर येणाऱ्यांना पाठलाग करुन बडवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी (दि. 26) सायंकाळपासून सोमवारपर्यंत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 25हून अधिक जणांना स्पेशल कमांडो जवानांनी काठीचा मजबूत प्रसाद दिला आहे. कमांडोंकडून मजबूत चोप मिळत असल्याने, विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने पूर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व नायगाव ही सात गावे बफर झोन (करोना प्रतिबंधित क्षेत्र) असल्याचे जाहीर केले.
करोनाबाधित क्षेत्र जाहीर झाल्यावर विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होईल असे वाटत असतानाच, वरील गावात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे आढळून आले. ठिकठिकाणी एकत्र येऊन पत्ते खेळणे, गप्पा मारत बसणे, विनाकारण दुचाकीवरुन गावात फिरणे, किरकोळ वस्तूच्या नावाखाली दुचाकी गाड्या घेऊन फिरणे असे उद्योग परिसरात वाढले होते. याबाबत स्थानिक पोलिसांनी वारंवार कारवाई करुनही नागरिक ऐकत नसल्याने, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक स्पेशल कमांडोची तुकडी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीला दिली आहे.
- सात गावांमध्ये होणार कारवाई
रविवारी (दि. 26) सायंकाळी कमांडोची तुकडी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल होताच, कमांडोंनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावात 25हुन अधिक विनाकारण फिरणाऱ्यांना मजबूत चोप दिला. तर सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेले काही महाभाग पोलिसांना पाहून, पळून जाण्याच्या तयारीत असतानाच कमांडोंनी त्यांची चांगलीच हौस पूर्ण केली. संध्याकाळच्या वेळेत गावात जमाव करुन गप्पा झोडणा-यांनाही कमांडोनी चांगलेच झोडपून काढले. कमांडोच्या कारवाईमुळे तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर येणार नाहीत, असा विश्वास लोणी काळभोर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कमांडो कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व नायगाव या सातही गावात कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.