पुणे –“झिका’ विषाणूची बाधा झालेला पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात सापडल्याने राज्याच्या पथकाने पाहणी केली आणि त्याचबरोबर केंद्राचेही पथक आले आहे. महापालिकेनेही खबरदारी म्हणून सावधानतेचा इशारा दिला आहे. डेंग्यू संदर्भात जे नियम आहेत तेच नियम यासाठी लावण्यात आले आहेत.
“झिका’ हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. टांझानिया आणि युगांडा या देशांमध्ये तो प्रथम आढळला आहे. हा विषाणू हा “फलॅव्हीव्हायरस’ प्रजातीचा असून, तो डेंग्यू आणि चिकुनगुनिया पसरवणाऱ्या “एडिस इजिप्ती’ डासांमार्फत पसरतो. त्यामुळे डेंग्यू आजाराविषयी जे जनजागृतीपर नियम आहेत, तेच या आजाराच्या जागृतीसाठी लागू करण्यात आले आहेत.
अशी घ्या काळजी
पावसाचे पाणी साठू देऊ नये.
रोपांच्या कुंड्यांखालील प्लेटमधील पाणीही सतत काढून टाकावे.
पाण्याची भांडी, ड्रम्स, रांजण झाकून ठेवावे, खराब टायर्स टाकून द्यावे.
आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा.
हा डास दिवसा चावतो. त्यामुळे दिवसाही झोपल्यास मच्छरदाणी लावावी.
अशी आहेत लक्षणे
झिका विषाणूची लागण झाल्यास त्याची लक्षणे ही डेंग्यूसारखी असतात.
त्यामध्ये ताप येणे, अंगावर रॅश उठणे, डोळे येणे, सांधे आणि स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. ती 2 ते 7 दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.
गरोदर महिलांसाठी मात्र हा आजार अधिक गंभीर
गरोदर महिलांसाठी मात्र हा आजार अतिशय घातक ठरणारा आहे. हा आजार जर गरोदर महिलेला झाल्यास त्याचा गंभीर परिणाम गर्भावर होतो. गर्भाच्या मेंदूची वाढच होत नाही, तसेच डोक्याचा घेर कमी होतो. याशिवाय कमरेपासून खालचा भाग लुळा होऊन ग्युलियन बारी सिंड्रोम निर्माण होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी दिवसा झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.