लोणावळा -प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खुनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले.भोला कुमार (वय 27, मूळ राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे.
भोला कुमार हा तरुणीच्या वडिलांच्या सोबत प्लंबिंगचे काम करत होता. 8 नोव्हेंबर रोजी तरुणी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील राजनगर विभागात युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे समजले.
त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती आपलीच मुलगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी भोलाकुमार याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला लोणावळ्यात पकडले.