कानपूर – 20 लाख रुपये द्या; काळे बुट, कोट आणि पॅंटची व्यवस्था करा… मला शरणागती स्वीकाराण्यासाठी मदत करा… त्याबदल्यात तुम्हाला कानपूरमध्ये जमीन आणि 48 तासांत दुप्पट रक्कम देतो. दुबेची साथ नेहमी मिळेल, असे आश्वासन विकास दुबेने भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला दिले होते. त्याची व्हॉट्स ऍप चॅटिंगची क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
सुबोध तिवारी असे या नेत्याचे नाव आहे. यात दुबे चार काळेकोट आणि पॅंट ( साईज 40), काळे बुट (आकार 8) यांची व्यवस्था करण्याची विनंती करत आहे. चॅटमध्ये मी एक दोन दिवसांत वकीलाच्या वेशांत न्यायलयात हजर होणार असल्याचे सांगत आहे.
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेता तिवारी म्हणाले ,हे व्हॉट्स ऍप चॅट आणि फोनचा तपशील मी पोलिसांच्या विशेष कृती दलाला दिला होता. हे संभाषण करणारा दुसऱ्या बाजूकडील व्यक्ती विकास दुबे होता याची खातरजमा मी केलेली नाही. मात्र हे संभाषण व्हायरल झाल्याने माझ्या जीविताला धोका असल्याने पोलिसांनी मला संरक्षण द्यावे.
मी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. त्यामुळेच हा कुख्यात गॅंगस्टर पकडला गेला. मात्र हे चॅट बाहेर कसे आले याची मला कल्पना नाही. मात्र इंटरनेटवर ते सर्वत्र व्हायरल झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मी दुबेच्या संपर्कात तीन दिवस होतो. पोलिसांच्या वतीने मी त्याच्याशी बोलत होतो. या संबाषणातून कोणताही माग नाही असे पोलिसांनी मला सांगितल्यावर मी हा क्रमांक ब्लॉक केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात इरफान सोळंकी यांचेही नाव घेतले जात आहे. मात्र त्यांनी याचा इन्कार केला असून मला गोवण्याचा भाजपाचा कट असल्याचा आरोप केला आहे. व्हायरल झालेल्या चॅटच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
विकास दुबेचा 10 जुलै रोजी चकमकीत मृत्यू झाला होता. त्यापुर्वी त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यात काही पोलिसांचा मृत्यू झाला होता. दुबेचे पाच सहकारी वेगवेगळ्या चकमकीत ठार झाले आहेत.