उरुळी देवाची येथे तीन लाखांचा मांस जप्त : एकास अटक
लोणी काळभोर – अत्यावश्यक सेवेचा पास लावून हडपसर-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची (ता. हवेली) येथे पिकअपमधून 3 लाख रुपये किमतीच्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
मोहसिन गफ्फार सौदागर (वय 30, रा. शिंगोली, ता. जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पोलीस हवालदार राकेश दिलीप मळेकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संचारबंदीचे आदेश असल्याने त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 21) सकाळी 8 वाजल्यापासून मळेकर, पोलीस हवालदार जयसिंग जाधव, हेमंत कामथे, होमगार्ड थोरात व माने हे पुणे-सासवड राज्यमार्गावर उरूळी देवाची दूरक्षेत्रासमोर नाकाबंदी करीत होते. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सासवड बाजुकडून एक पिकअप (एमएच 25 एजे 2285) आली. तिला थांबवली असता या पिकपच्या पुढील काचेवर अत्यावश्यक सेवेचा पास लावलेला दिसून आला.
चालकास गाडीमध्ये काय आहे ? अशी विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने या गाडीच्या मागील बाजूस असलेला बंद दरवाजा उघडून पहाणी केली असता आतमध्ये अंदाजे 3 लाख रुपये किमतीचे दीड टन कापलेले गोवंश सदृश्य मांस मुंडके, धड कातडी काढलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर आरोपी सौदागरकडे कसून चैकशी केली असता त्याने गोमांस उस्मानाबाद, शिंगोली येथून भरून ते मुुंबई, कुर्ला येथे विक्रीसाठी घेवून जाणार आहे असे सांगितले. शेवाळवाडी (ता. हवेली) येथील पशुवैद्यकीय अधिकारी बी.जे.तेजनकर यांनी पिकअपमधील मांसाची तपासणी करून ते गोमांस असल्याचे सांगितले. याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.