बीड – राज्यात हत्येच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये एका चिमुकल्याच्या हत्येच प्रकरण ताजं असतानाच बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथे दारुच्या नशेत मुलाने जन्मदात्या आईलाच ठार केल्याचं उघड झालं.
पोटच्या मुलानं दारूच्या नशेत आपल्या आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील चौसाळा गावातील ही घटना असून आईचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतात, नराधम मुलाने पळ काढला. मात्र नेकनूर पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70) असं मृत वृद्धेचं नाव असून मदन पांडुरंग मानगिरे (वय 28) असं नराधम आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मदन मानगिरे याने रात्री ११ ते १२ च्या दरम्यान लाकडी मुसळाने आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आईचा मृत्यू झाल्याचं कळताच आरोपीने गावातून पळ काढला आणि महाकाळा येथे सासरवाडीत पोहोचला. येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला शहागड येथून अटक केली.
आरोपी मुलाची रवानागी कारागृहात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.