पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (दि. 23) वाढ करण्यात आली आहे. होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे सांगितले होते. ते सोळा जण कोण आहेत, याचा तपास केला. मात्र, त्यांची नावे सांगण्यास नकार देण्यात आला आहे. “टक्केवारीचे पैसैवर सोळा जणांना द्यावे लागतात.
तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारी तीनऐवजी दोन करा’, असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून हे 16 जण कोण आहेत. याची माहिती आरोपींकडून घेतली जात आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. त्यानुसार पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (वय 50 , रा. भोसरी), त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (वय 50, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (वय 51, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया वय 38, रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सुरुवातील शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना न्यायालयात हजर केले होते.