सातारा – कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसतोड संपल्यानंतर मूळ गावाकडे निघालेल्या उसतोड मजुरांना महामार्गावर कथित गोरक्षकांनी अडवून त्यांना जनवारे कत्तलखान्यात नेत असल्याच्या संशयावरून मारहाण केली.
याप्रकरणी साईनाथ साहेबराव फुंदे (रा. आनंदगाव,ता. शिरूर, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संकेत विजकुमार शिंदे (रा. पिल्लेश्वरीनगर, म्हसवे) याच्यासह अनोळखी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साईनाथ फुंदे व त्यांचे सहकारी शिवनाथ फुंदे, पांडुरंग गिते, लक्ष्मण काळे, हणमंत गोरे, सुरेश रोकडे, सखाराम विघ्ने हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसतोड करण्यासाठी आले होते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने उसतोड करणारे मजूर त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित होत आहेत. या कामगारांची पाळीव जनावरे ट्रकमधून (एमएच 16 सीसी 7267) त्यांच्या गावाकडे नेत असताना त्यांचा ट्रक सातारा शहरालगत महामार्गावर आला असता दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी आपण गोरक्षक असल्याचे सांगून फुंदे यांचा ट्रक थांबवला.
त्यानंतर ट्रकमधील जनावरांची पाहणी करून फुंदे यांना मारहाण करून ते निघून गेले. त्यानंतर ट्रक पुढे सेवा रस्त्याला आल्यावर फुंदे यांना मारहाण करणारे युवक व पोलीस एकत्र उभारल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तुम्ही ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची तक्रार संकेत शिंदे याने केली असल्याचे सांगून वाहन पोलीस ठाण्यात घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी संकेत याच्या तक्रारीवरून जनावरांचा छळ केल्याचा गुन्हा फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. त्यानंतर आपल्याला मारहाण करणारा युवक हा संकेत शिंदे असल्याचे कळताच फुंदे यांनी त्याच्यासह साथीदारांवर मारहाणीची फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार केळगणे तपास करत आहेत.