हडपसर –हडपसर उड्डाणपूल पुलाच्या बेरिंग दुरुस्तीनंतर दोन महिन्यांनंतर पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी अवजड वाहतुकीला बंदी असल्याने अशी वाहने पुलाखालून जात आहेत. त्यामुळे पूल सुरू झाला असला तरी अवजड वाहनांमुळे उड्डाणपुलाखालून, शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर अजवड वाहनांची गर्दी होत असून गाडीतळ ते हडपसर गावात कोंडी होत आहे. त्यामुळे अवजड वाहने उरूळी देवाची मार्गे कात्रज बाह्यावळण मार्गाने शहरात सोडण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे.
हडपसर येथील उड्डाणपूल पुण्याहून-सोलापूरकडे तसेच सोलापूरकडून व सासवडकडून-पुण्याकडे अशा दोन्ही बाजुने सुरू करण्यात आला आहे. परंतु, या पुलावरून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून पुलाच्या दोन्ही बाजुला हाइट बॅरिअरर्स लावण्यात आले आहेत. ही बॅरिअर्स तोडून अवजड वाहने पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात, यातून बॅरिअर्स कित्येकदा तुटले आहेत. त्याची दुरूस्तीही अनेकदा करण्यात आली आहे. यातून अशी अवजड वाहने पुलाखालून गाडीतळ मार्गे वळण घेऊन पुणे तसेच सोलापूरच्या दिशेने जात असल्याने गाडीतळ ते हडपसर गावात गर्दी कायम आहे. त्यामुळे हडपसर भाजी मार्केट तसेच अन्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीत अकडून पडावे लागते. ही वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर अवजड वाहने उरूळीदेवाची कात्रज बाह्यवळण मार्गे सोडण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.