खडकवासला – सह्याद्रीच्या डोंगर रांगातील अतिविशाल, अभेद्य सुळके,शिखरे पाहून अंगावर शहारे येतात, अशाच अतिदुर्गम तैल व बैल (ता.मुळशी) या दोन सुळक्याच्या कातळखडकात मध्यभागी झोका बांधून तेथे मुक्काम करण्याचे साहस मावळा जवान संघटनेच्या गिर्यारोहकांनी केले. साडेतीन हजार फूट उंचीवरील दरीत, झोक्यात उभे राहून मावळ्यांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
चोहोबाजूंनी उंच डोंगरकडे असलेल्या अद्भुत विशालता व अत्यंत दुर्गम सुळके म्हणून तैल व बैला या सुळक्यांची ओळख आहे. या सुळक्यांच्या मध्यभागी जवळपास ऐंशी फूट अंतर आहे.
सुळक्यांच्या मध्यभागी खडकात बोल्ट बसवून त्याला दोरखंड बांधण्यात आले, त्या आधारे दोरखंडांला मध्यभागी कापडाचा झुलता झोका बांधण्यात आला.सिंहगड येथील मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक लहु उघडे एका झोक्यात आणि दुसऱ्या झोक्यात तुषार दिघे अशा दोघांनी शनिवार (दि.23) ते रविवार (दि. 24) असा मुुक्काम झोक्यात केला.
अतिविशाल सुळक्यावर झुलता झोका बांधण्याचा हा देशातील पहिलीच यशस्वी प्रयत्न आहे. मावळा जवान संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित नलावडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.