नवी दिल्ली – तीन महिने घरातच अडकून पडलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचे सहा आठवड्यांचे सराव शिबिर बीसीसीआय आयोजित करणार आहे.
करोनाचा धोका वाढल्याने सर्व मालिका एकतर रद्द झाल्या किंवा स्थगित करण्यात आल्या. धोनी आयपीएलमध्ये सरस कामगिरी करुन भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी चेन्नई सुपरसिंग संघाच्या सराव सत्रातही सहभागी झाला होता. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने हे सत्र बंद झाले व सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले.
आता तीन महिने झाल्यानंतर करोनाचा धोका काही शहरांमध्ये खूपच कमी झाल्याने बीसीसीआयने सराव शिबिर आयोजित करण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यात धोनीच्या सहभागाबाबत अद्यापही काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. हे शिबिर पुढील महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याचे संकेत असून सहा आठवडे भारतीय संघातील खेळाडू यात सहभागी होणार आहेत.
हे शिबिर कोणत्या राज्यात तसेच कोणत्या शहरात होईल याबाबत बीसीसीआयने काही जाहीर केले नसले तरीही खेळाडूंचे आरोग्य तसेच सुरक्षा सर्वात महत्त्वाची असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.