कोलकता -विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी शेख कौसर या बांगलादेशी नागरिकाला विविध आरोपांवरून दोषी ठरवत एकूण 29 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. कौसर हा खागरागढ स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे.
पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील खागरागढ परिसरात 2 ऑक्टोबर 2014 या दिवशी बॉम्बस्फोट झाला. ती घटना एका घरात घडली. भाडेपट्ट्यावर घेण्यात आलेल्या त्या घरात बॉम्ब आणि इतर स्फोटके बनवली जात होती. संबंधित स्फोटात दोन संशयित दहशतवादी ठार झाले, तर त्यांचा एक साथीदार जखमी झाला. स्फोट झालेल्या घरात जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेचे सदस्य राहत असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित प्रकरणाचे गांभीर्य ध्यानात घेऊन राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास सोपवण्यात आला. त्यानंतर 33 पैकी 31 आरोपींना अटक करण्यात आली. कौसरसह अटक करण्यात आलेल्या सर्वांना आतापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कौसर याला 5 आरोपांवरून दोषी ठरवत प्रत्येकी 5 वर्षांची, तर 2 आरोपांबद्दल प्रत्येकी 2 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ती शिक्षा त्याला एकापाठोपाठ एक करत भोगावी लागणार आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षेचा एकूण कालावधी 29 वर्षे इतका झाला. त्याशिवाय, कौसरला 29 हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला.