पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू यशवंत जाधव यास वैद्यकीय कारणास्तव दिलेला तात्पुरता जामीन 2 महिने वाढवून देण्यात आला आहे. त्याला इतर आजार असल्याने विशेष मोक्का न्यायाधीश ए. एन. सिरसिकर यांनी हा आदेश दिला आहे.
जाधव याला वैद्यकीय कारणास्तव 24 एप्रिल रोजी विशेष मोक्का न्यायालयाने एक महिन्याकरिता जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यास काही आजार आढळून आल्याने जामिनाची मुदत वाढवून मिळावी यासाठी बचाव पक्षाचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. हितेश सोनार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाची सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीस मेडीकल बोर्डासमोर वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत त्यास इतर आजार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहेत. उपचार न मिळाल्यास त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. ठोंबरे यांनी मांडली. वैद्यकीय कागदपत्रांचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत वरील आदेश दिला.