शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथील घटना
मांडवगण फराटा- बाभूळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे विजेचा शॉक बसल्याने वडिलांसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दत्तात्रय दगडू नागवडे (वय 50) प्रसाद दत्तात्रय नागवडे (वय 16) दोघेही (रा. बाभूळसर बुद्रुक, ता. शिरूर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत संतोष नारायण नागवडे यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.
सोमवारी (दि. 1) जून रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घरातील खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करत असताना वायरला स्पर्श झाल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला व त्यावेळी ओरडण्याचा आवाज आला, त्यावेळी घरातील नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता दोघेही जखमी झाले होते. त्यावेळी दत्तात्रय नागवडे यांना मांडवगण फराटा येथील खासगी दवाखान्यात आणले. परंतु दत्तात्रय नागवडे हे उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसाद याला दौंड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे, हवालदार रुपनवर, आबासाहेब जगदाळे, योगेश गुंड, अक्षय गुंड हे करीत आहेत.