सातारा – राष्ट्रीय आयुष अभियानाच्या आयुष सेवा उपक्रमांतर्गत आयुष ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातून 17 आयुर्वेद दवाखान्यांपैकी चोरे (ता. कराड) येथील आयुर्वेद दवाखान्याची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. राज्यातून 2023- 24 या वर्षामध्ये केवळ 9 दवाखान्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये चोरे येथील आयुर्वेद दवाखान्याचा समावेश आहे.
नॅशनल ऍक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर नामांकनासाठी चोरे आयुर्वेद दवाखान्याचे मूल्यमापन करण्यात आले. या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका कांबळे यांनी आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामध्ये आयुर्वेद निदान, उपचार, विद्धकर्म, अग्निकर्म तसेच आयुर्वेद वनौषधी उद्यानामधून लोकांना त्याची ओळख व उपयुक्तता पटवून दिली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून गावाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला.
आयुष ग्राम उपक्रमात निवड होण्यासाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे विशेष योगदान आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार, इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृशल जाधव, मस्करवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती यादव यांच्या मार्गदर्शनामुळे सातारा जिल्ह्याने राज्यात बाजी मारली. चोरे आरोग्यवर्धिनी केंद्राची आयुष ग्राम उपक्रमासाठी निवड होणे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. कमी मनुष्यबळात या आरोग्य संस्थेने यश मिळवले आहे. भविष्यात येथे अनेक अभिनव उपक्रम राबवून येथील रुग्णांना अधिक आयुष आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार यांनी दिली.
चोरेच्या आयुष आरोग्यवर्धिनी केंद्राची आयुष ग्राम या उपक्रमासाठी राज्यस्तरावर निवड होणे आरोग्य विभागासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजात आणखीसुसुत्रता आणून जिल्हावासियांना गतीने आरोग्याच्या सुविधा पुरवण्यावर भर राहणार आहे.
– डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी