अवती-भोवती : कुणी काम देता का काम?

बेरोजगारी हा शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे. येणारा भविष्यकाळ रोजगारासाठी किती भयानक आहे हे जागतिक अहवालांच्या निष्कर्षांवरून समोर येते. रोजगारासाठी चालू वर्ष फारसे समाधानकारक नाही. एका आंतरराष्ट्रीय सर्व्हेनुसार यावर्षी बेरोजगारीचा आकडा धोक्‍याची पातळी ओलांडणार आहे. यात भारतातील बेरोजगारीही समाविष्ट आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) नवीन अहवालानुसार जगभरातील 47 कोटी लोक रोजगार नसल्याने हलाकीचे जीवन जगत आहेत. या लोकांकडे पोट भरण्यासाठी काहीही पर्याय उपलब्ध नाही. सध्याचा जागतिक बेरोजगारी दर 5.4 टक्‍के आहे.

या अहवालानुसार 2020 या चालू वर्षात 19 कोटींपेक्षा अधिक बेरोजगार निर्माण होणार आहेत. भारतात सध्या आर्थिक मंदी आणि लोकसंख्या विस्फोट यामुळे रोजगार क्षेत्रात धोक्‍याची घंटा निर्माण झाली आहे. देशात बेरोजगारीच्या स्थितीत काहीही सुधारणा दिसून येत नाहीये. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमिक या संस्थेने दर्शविलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर 2019 या चार महिन्यांत बेरोजगारी दर 7.5 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. यात उच्च शिक्षितांचा बेरोजगारी दर 60 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

या अहवालानुसार मे ते ऑगस्ट 2017 नंतर लागोपाठ सातव्यांदा बेरोजगारी वाढलेली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे. शहरी भागात सध्या बेरोजगारी दर 9 टक्‍के आहे. याचा अर्थ शहरातील बेरोजगारी दर राष्ट्रीय दरापेक्षाही अधिक आहे. ग्रामीण भागात सध्या बेरोजगारी दर 6.8 टक्‍के आहे. आपला देश महागाईने चिंतातूर आहे त्यातच हाताला काम नसेल तर लोकांवर उपासमारीची वेळ येईल.

चालू वित्तीय वर्षात रोजगार संधी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. 2018 या वर्षी 12 हजारांपेक्षा जास्त बेरोजगारांनी आत्महत्या केली आहे. भारतासारख्या तरुणांच्या देशात तरुणच परिस्थितीमुळे हातावर हात ठेवून बसले तर देशाचा विकास कसा होईल?

– विद्या झनके

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.