प्रेरणा : कचरामुक्‍त जीवनशैली

कोलकात्याच्या लता भाटिया या 57 वर्षीय महिलेच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे गेली 5 वर्षे त्या कचरामुक्‍त जीवन जगत आहेत. कोलकाता हे प्रचंड लोकसंख्या असलेले शहर. तिथे नागरी कचरा व्यवस्थापन पद्धतीचा पुरता बोजवारा उडालेला. कोलकात्याच्या चुकीच्या कचरा व्यवस्थापनाच्या बातम्या सतत चर्चेच्या झोतात असतात.

तसे पाहता कोलकाता शहर गेल्या एक दशकापासून या समस्येने ग्रस्त आहे. या शहरात प्रदूषणाचे प्रमाणही सर्वाधिक राहिले आहे. काही स्वयंसेवी व सेवाभावी संस्था तसेच व्यक्‍तींनी महानगराच्या कचरा नियोजन व व्यवस्थापनासाठी काम केले; पण कोलकात्यातल्या कचऱ्याचे प्रचंड प्रमाण पाहता त्यांचे प्रयत्न अर्थातच मर्यादित ठरले.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर कोलकात्याच्याच लता भाटिया यांनी आपले “झिरो वेस्ट स्टोअर’ सुरू केले. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांचे प्रयत्न लोकप्रिय झाले. मुख्य म्हणजे लता भाटियांच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, सेंद्रिय वस्तू-उत्पादने एकाच छताखाली मिळू लागले. त्यामुळेच लोकांना भल्या मोठ्या मॉल वा सुपरमार्केटपेक्षा लताजींचे छोटेखानी दुकान अधिक सोयीचे व आपलेसे वाटू लागले.

आपल्या उपक्रमाबद्दल व कचरामुक्‍त प्रयत्नांबद्दल लता भाटिया सांगतात की, “कोलकात्यात नजर जाईल तिथे कचराच दिसायचा. सगळीकडे पसरलेली घाण, उघड्यावर होणारे मलमूत्र विसर्जन याची काळजी वाटायची. या घाण आणि कचऱ्याचा त्रास स्थानिकांना तर होतोच, शिवाय त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी दिसायची. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आपणच काही प्रयत्न करून पुढाकार घेण्याच्या दृष्टीने कृतिशील सुरुवात केली.’

लता भाटिया यांनी 2016 मध्ये कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यासाठी त्यांनी शाश्‍वत जीवनशैलीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात पहिले पाऊल टाकताना घरीच कचऱ्यातून खत बनविण्यास सुरुवात केली. घरीच अशा प्रकारे खत बनवायला सुरुवात केल्यावर त्यांनी इतरांना पण अशाच पद्धतीने खत बनविण्यासाठी प्रवृत्त केले. शेजारी-पाजारी, नातेवाईकांना पण त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांचे हे पाऊल त्यावेळी छोटेसे भासले असले तरी अल्पावधीतच त्याचा परिणाम प्रकर्षाने जाणवू लागला. परिणामी त्यांच्या परिसरातील कचरा साम्राज्य कमी झालेले जाणवू लागले.

आपल्या प्रयत्नांना मिळालेल्या प्रतिसादामुळे लता भाटियांनी कोलकात्याच्या कचरामुक्‍तीचा संदेश इतरत्र लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “ग्रीन लीग’ या नावाची संस्था सुरू केली. संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कचऱ्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या कोलकात्यामध्ये आपला वैयक्‍तिक पुढाकार व प्रयत्नांद्वारे आधी वैयक्‍तिक स्तरावर “झिरो वेस्ट स्टोर’ व या स्टोरचा उपक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर या प्रयत्नांना अधिक व्यापकता देण्यासाठी “ग्रीन लीग’च्या माध्यमातून आपल्या पर्यावरण संरक्षणविषयक प्रयत्नांना लता भाटियांनी व्यापक सामाजिक आयाम दिले आहेत.
– दत्तात्रय आंबुलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.