मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. यावेळी नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी पंतप्रधान बीकेसीहून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद ठेवली जाणार आहे.
सायंकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे. ती वेळ ऐन गर्दीची असल्याने त्याचा मुंबईतील सामान्य नागरिकांना आणि नोकरदारांना जबर फटका बसणार असल्याचं बोललं जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मेट्रो मार्गिकाच बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावेळी कामावरून घरी जाणाऱ्या नोकरदारांचे सायंकाळच्या वेळी चांगलेच हाल होणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम होणार असून, राज्य सरकारकडून याची जोरदार तयारी सुरू आहे.