नवी दिल्ली -जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिसांनी दडपशाहीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला असून त्यात काही खेळाडू जखमीही झाल्याचे सांगत आम्ही आजवर मिळालेले सर्व पुरस्कार व पदके परत करणार आहोत व कितीही दडपशाही केली तरीही हे आंदोलन सुरूच राहील यावर हे कुस्तीपटू ठाम आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी हे आंदोलन छेडले. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अनेक खेळाडूंना दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. याचा निषेध म्हणून हे कुस्तीपटू आता सरकारकडे आपले पुरस्कार व पदके परत करण्यात आहेत. तसेच जोपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई होत नाही व चौकशी अहवाल जाहीर केला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असेही या कुस्तीपटूंनी सांगितले आहे.
ट्रॅक्टर रॅली काढण्याचे पुनियाचे आवाहन
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सर्व खेळाडूंनी व पाठीराख्यांनी एकत्र येत ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आवाहन ऑलिम्पिकपटू बजरंग पुनिया याने केले आहे. संपूर्ण देशाच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. आम्हाला न्याय हवा आहे व त्यासाठीच आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत.
पुनियाच्या या आवाहनाला साक्षी मलिक, विनेश फोगट आणि संगीता फोगट यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, या पोलिसांनी केलेल्या दडपशाहीत जे खेळाडू जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठीही पाठवण्यात आले असल्याचेही सांगितले जात आहे.