राज्य लोकसेवा आयोग इमारतीसाठी नवी मुंबईत भूखंड उपलब्ध
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तब्बल 68 वर्षांनंतर स्वत:चे मुख्य कार्यालय बांधण्यासाठी जागा मिळाली आहे. त्यासाठी नवी मुंबईत बेलापूर येथे 4 हजार 757 चौरस मीटर भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयोगाच्या नियोजित इमारत बांधकामासाठी 97 कोटी 46 लाखांच्या खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आयोगाला स्वतंत्र मुख्य कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही लोकसेवा आयोगामार्फत होत असते. आयोगातर्फे स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यानुसार आयोगाकडून उमेदवारांची शिफारस केली जाते. त्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येने परीक्षा घेणाऱ्या आयोगाला मात्र स्वतंत्र इमारत नाही. त्याचा परिणाम नियोजनावर होत असल्याचे निदर्शनास आले. सध्या मुंबईत तीन ठिकाणी भाड्याच्या जागेतच आयोगाचे कामकाज सुरू आहे.
राज्य प्रशासनाचा गाडा चालविण्यासाठी सक्षम व गुणवत्ताधारक अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्वत:च्या मालकीची जागा नाही. आयोगाला हक्काची जागा मिळावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी केली होती. त्यानुसार आयोगाला मुख्यालयासाठी स्वत:ची जागा असावी, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शिफारशीनुसार आता राज्य शासनाने आयोगाला स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.