नगर – नगर महापालिकेने विळद घाटातील डॉ. विखे फाउंडेशनला दिलेली पाणीपट्टीतील सवलत कायदेशीर आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तसा ठराव केला आहे. त्यावेळी एकाही नगरसेवकाने त्या ठरावाला विरोध केला नव्हता. आज यावर आक्षेप घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही या ठरावाला विरोध न करता पाठिंबाच दिला होता, असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी विखे फाउंडेशनला मनपाने थकीत पाणीपट्टीत दिलेल्या सवलतीला आक्षेप घेतला आहे. या आक्षेपावर खासदार विखे यांनी उत्तर दिले. विखे पुढे म्हणाले, की महापालिकेशी संबंधित हा मुद्दा आहे, तेव्हा याची उत्तरे महा-पालिकेकडूनच घ्यायला हवीत. महापालिकेने यावर खुलासा केल्यानंतर आणखी कोणाला काही शंका असेल तर त्याची उत्तरे द्यायला मी तयार आहे.
महापालिकेच्या महासभेत भारतीय जनता पार्टीचा महापौर असला तरी त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या कमी होती. त्यामुळे ज्यावेळेस हा विषय महासभेत चर्चेला आला, त्यावेळेस कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने या विषयाला विरोध केला नाही. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. आज जे आक्षेप घेतात त्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही त्यावेळी विरोध केलेला नाही. महापालिकेत महासभा सर्वोच्च असते. त्यामुळे कोणाला काही शंका असेल तर त्यांनी महापालिकेकडे उत्तर मागावे, असेही विखे यांनी सांगितले. यानंतरही काही शंका असेल तर उत्तरे देण्यास मी तयार आहे, असेही खासदार विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.