ठरलं…नर्सरी प्रवेशासाठी किमान तीन वर्षे पूर्ण आवश्यक, वाचा नवीन नियम

पुणे – राज्यातील शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले असून त्यानुसारच कार्यवाही करुन प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. नर्सरीसाठी किमान तीन वर्षे पूर्ण आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

 

शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयावरुन अनेकदा गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. आता शासनाने शाळा प्रवेशाच्या वयाबाबतचे आदेशच जारी केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. शासनाच्या 25 जानेवारी 2017 च्या निर्णयानुसार शाळा प्रवेशासाठी 30 सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आला होता. आता शासनाने 31 डिसेंबर हा मानिव दिनांक निश्चित केलेला आहे.

 

त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांतील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष सन 2021-22 साठी अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. मानिव दिनांक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी किमान व कमाल वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे.

 

दि.1 ऑक्टोबर 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील जन्मलेल्या बालकांना नर्सरीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. 1 ऑक्टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील बालकांना एल.के.जी.मध्ये प्रवेश मिळणार आहे. 1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील बालकांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. नर्सरीसाठी किमान तीन वर्षे तर पहिलीसाठी सहा वर्षे वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळांनी प्रवेशासाठी या नियमांचे पालन करावे, असेही जगताप यांनी आदेशात नमूद केलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.